छत्रपती शिवाजी महाराज व मावळे-
डॉ.राज भुजंगराव ताडेराव
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वाने महाराष्ट्रात
स्वराज्याची स्थापना करून खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य स्थापन केले. हे राज्य स्थापन करताना त्यांना सर्व जाती-धर्मातील तरुणांची
जी साथ लाभली, त्यास 'मावळे' या नावाने संबोधले जाते. हे मावळे कुणी सरदार, जमीनदार व वतनदार वर्गातील
नव्हते तर ती इथल्या सामान्य शेतकऱ्याची, श्रमिकांची मुले होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात सरंजामशाही समाजरचना अस्तित्वात असून मुघल, आदिलशाही व कुतुबशाही या
सत्तेकडे खडे सैन्य होते. लढाया करणे हाच त्यांचा व्यवसाय व उपजीविकेचे साधन
होते. त्यामुळे
हे सैनिक या सत्तेकडे वर्षभर कामावर असत. परंतु या
काळात छत्रपती शिवाजी महाराजांकडे सर्वच बारमाही सैन्य नव्हते तर काही खडे सैन्य होते. परंतु बहुतेक मावळे हे शेती करत व आपल्या कुटुंबासोबत
राहत. त्यामुळे शेती व आपल्या कुटुंबाशी
सातत्याने संबंध असणाऱ्या मावळ्यांची मानसिकता ही दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची व संपत्तीची काळजी
करण्याची होती. ते छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे इतरांच्या लेकी-सुनांचा आदर
करत. दुसऱ्याची शेती
व पिके पाहून
त्यांना स्वतःची पैकी आठवत, दुसऱ्याच्या लेकी-सुना पाहून
त्यांना स्वतःच्या लेकीसुना आठवत, त्यामुळे ते कधीही अत्याचार करत नसत, नासधूस व
लूट करीत नसत, स्त्रियांची अब्रू
घेत नसत. परंतु इतर
राजांचे आणि सरदारांचे सैन्य हे लुटारूचे सैन्य होते. लूट करणे, सैनिकांच्या सामर्थ्याच्या जोरावर चैनी करणे, स्त्रियांची अब्रू लुटणे हाच त्यांचा हेतू होता. या काळात स्त्रियांच्या अब्रूला विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. राजेरजवाडे, राजपूत, सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकी-सुना म्हणजे
त्यांना हव्या त्या वेळी उपभोगण्याची वस्तू होत्या. दिवसाढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात असे. त्याविरुद्ध कुणाकडे
दाद मागता येत नव्हती. ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते. ते सैनिकांना पगार न देता लुटीतला
हिस्सा देत. त्यामुळे हे
सैनिक जास्तीत जास्त लूट करीत
व जनतेवर जुलूम करीत असत. अशा काळात
छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी
या व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष केला.
छत्रपती
शिवाजी महाराजांचे शुद्ध चारित्र्य, त्यांनी सैनिकांना दिलेल्या आज्ञा, आज्ञेचा भंग करणाऱ्यांना जरब बसेल अशा शिक्षा, शेतकऱ्यामधूनच केलेली सैन्याची रचना, रोख-पगार
देण्याची पद्धत, यामुळे मावळ्यांनी अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या हेतूने कार्य केले. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य व इतर सत्तेचे
सैन्य यात फरक होता. या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील सामान्य जनतेला शिवाजी महाराजांचे सैन्य हे लुटारूचे सैन्य वाटत नव्हते किंवा सैन्याची रयतेला भीती वाटत नव्हती तर सैनिकांबद्दल व स्वराज्याबद्दल आपुलकीची भावना
होती. ज्या
मावळ्यांच्या चिवटपणावर व त्यांच्या निष्ठेवर
आणि त्यागावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय पराक्रम केला. ते सर्व मावळे सामान्य शेतकरी व कष्टकरी वर्गातील
होते.
शिवाजी
महाराजांना स्वराज्याच्या उभारणीत जुने वतनदार सरदारांनी फारशी साथ दिली नाही यावेळी सर्व जाती-जमातीतील मावळ्यातून
शिवाजी महाराजांनी छोटे-मोठे नवे
सेनानायक निर्माण केले. ते सर्व या महाराष्ट्रातील रामोशी, महार, मांग, चांभार, न्हावी, साळी, माळी, धनगर, कुंभार, ब्राह्मण, कुणबी, आदिवासी, मुसलमान इत्यादी अनेक जाती-धर्मातील होते. ते आपल्या
पराक्रमाने
मोठे झाले.या मावळ्यांनी
शिवाजी महाराजांच्या प्रत्येक संघर्षात त्यांना अतुलनीय साथ दिली. जीवाची पर्वा न करता स्वतःचे
बलिदान दिले. शिवाजी महाराजांना पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून जायला मदत करणारे शिवा न्हावी हे होते. तर अफजलखान भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा विश्वासू आणि चपळ लढवय्या म्हणून बरोबर गेलेला जिवा महाला हा सुद्धा जातीने न्हावी होता.
शिवाजी
महाराजांच्या हेरखात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक हा रामोशी जातीतील होता. प्रत्यक्ष शेती करून उपजीविका करणाऱ्या सर्वसामान्य कुणब्यांना शिवाजी महारांजानी साथीला घेतले व राज्य स्थापले. शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांचे किल्लेदार हे महार, मांग, रामोशी, चर्मकार, न्हावी, धनगर, कुणबी या समाजातील कर्तबगार तरुण होते.
छत्रपती
शिवाजी महाराजांनी राज्यकारभारात जातीपातीचे राजकारण कधीही केली नाही तर अतिमागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महार, मांग, चांभार, रामोशी यासारख्या जाती-जमातींना लष्करात
महत्त्वाची पदे दिली. त्यामुळे स्वराज्यातील किल्ल्याच्या ठिकाणी महत्त्वाच्या पदावर या जातीतील कर्तुत्व व्यक्ती दिसतात. लहुजी साळवे यांचे खापर पणतू थोरले लहुजी साळवे हे पुरंदर किल्ल्याच्या जवळील पेठ नावाच्या वस्तीत तरुणांना तलवारबाजी, घोडेस्वारी, दांडपट्टा, कट्यार, वाघनखे, निशाणीबाजी इत्यादी शस्त्रविद्येचे शिक्षण देत असत. दांडपट्टा या
शस्त्र विद्येत थोरले लहुजी साळवे यांचा विशेष हातखंडा असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्याकडे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची व सैन्याच्या प्रशिक्षणाची
जबाबदारी दिली होती. व त्यांच्या कर्तबगारी
व शौर्यामुळे त्यांना
राज्याभिषेक दिनी
'राऊत' नावाची उपाधी देऊन त्यांचा सन्मान केला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे नाविक शक्तीचे जनक संबोधले जातात. त्यांनी जे आरमार उभारले होते. ते उभारण्यासाठी आरमारातील बहुसंख्य सैनिक हे कोळी, सोनकोळी, भंडारी व मुसलमान इत्यादी
जातीतील होते. समुद्राच्या काटावर पोट भरणाऱ्या कष्टकऱ्यांना शिवाजी महाराजांनी सैनिक बनवले व स्वराज्याचा पाया
भक्कम केला. त्यांनी सामान्यातील
शेतकरी, कष्टकर्यांना मोठे
केले आणि या सामान्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठे केले आणि सर्वांनी मिळून स्वराज्याच्या उभारणीचे कार्य केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपेक्षा व्यक्तीच्या कर्तृत्वाला महत्त्वाचे स्थान दिले त्यामुळे चांगला विचार सामान्य लोक जेव्हा स्वीकारतात तेव्हा तो विचार हीच शक्ती होते. आणि ती शक्ती सामान्याकडून असामान्य कार्य करून घेते. सामान्यांच्या सहकार्याखेरीज, सहभागाखेरीज इतिहासातील असामान्य कार्य होत नाही. यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती -धर्मातील मावळ्यांना संघटित केले. त्यांना शहाणे केले, मोठे केले आणि जुलुमाला आळा घातला. त्यामुळे ज्यांना जुलूम सहन करावा लागला तेच जुलूम नष्ट करू शकतात. यातून मावळयांनी आपल्या कृतीतून स्वराज्याच्या निर्मितीत मोठा हातभार लावला. शिवाजी महाराजांचे मावळे मृत्यूला सामोरे जायला मागे राहिले नाहीत. मदारी मेहतर, हिरोजी फर्जद, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे,शिवा न्हावी अशा किती तरी मावळ्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आपले बलिदान दिले. कारण 'आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी जगला पाहिजे' ही प्रत्येक मावळ्याची भावना होती. त्यामुळे स्वराज्याच्या उभारणीत मावळ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरते.
Comments
Post a Comment